जनगणनेसाठी शिक्षकांना पडणार मोबाइलचा भुर्दंड !
‘एचएलओ अॅप’साठी अद्ययावत मोबाइल गरजेचा; अनेकांकडे जुनेच व्हर्जन असल्याने बसणार फटका
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
यंदाची जनगणना डिजिटल स्वरूपात होणार असल्याने शिक्षकांना ‘एचएलओ’ हे मोबाइल अॅप डाउनलोड करावे लागणार आहे. या अॅपसाठी अँड्रॉइड व्हर्जन ११ / १२ किंवा अॅपल व्हर्जन १५ आवश्यक आहे. मात्र, अनेक शिक्षकांकडे जुन्या व्हर्जनचाच मोबाइल असल्याने त्यांना नवीन मोबाइल घ्यावा लागणार आहे. यामुळे अनेक शिक्षक तणावात असून, जनगणनेसाठी शासकीय स्तरावरून टॅब उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
जनगणनेसाठी सध्या शहरातील आर. पी. विद्यालयात शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे. जनगणनेसाठी आवश्यक त्या सूचना या प्रशिक्षणात दिल्या जात आहेत. त्यामध्ये ही जनगणना कशी करावी याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले जात असून, डिजिटल जनगणनेसाठी एचएलओ मोबाइल अॅप शिक्षकांना डाउनलोड करावे लागणार आहे. यासाठी शिक्षकांकडे किमान अँड्रॉइड व्हर्जन ११/१२ किंवा अॅपल व्हर्जन १५ आवश्यक आहे. सद्यस्थितीत बहुतांश शिक्षकांकडे जे मोबाइल आहेत ते जुन्या व्हर्जनचे आहेत. परिणामी, हे अॅप त्यांच्या फोनमध्ये चालत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जनगणना पूर्ण करण्यासाठी नाइलाजास्तव नवीन मोबाइल खरेदी करावा लागणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्यासाठी साधारण २० ते २५ हजार रुपयांचा नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील शिक्षकांमध्येही यामुळे मोठी नाराजी आहे. त्यामुळे सरकारने ‘एचएलओ’ अॅपमध्ये तांत्रिक बदल करण्याची मागणी शिक्षकांमधून होत आहे. सर्व प्रगणक शिक्षकांना शासनामार्फत टॅब उपलब्ध करून देण्यात यावेत, अशीही या शिक्षकांची मागणी आहे.
सर्व शिक्षक या राष्ट्रीय कामात ” प्रामाणिकपणे योगदान देत आहेत आणि हे काम पूर्ण क्षमतेने पार पाडण्यासाठी कटिबद्ध आहेत. परंतु, केवळ अॅपसाठी त्यांना नवीन मोबाइल घेणे परवडणारे नाही. त्यामुळे सरकारने अॅपमध्येच करण्याची गरज आहे. याबाबत विचार व्हावा.
– विनित पवार, कार्यवाह,
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद
मोबाइल खरेदीतच मानधन होणार खर्च
जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांना पहिल्या टप्प्यात नऊ हजार व दुसऱ्या टप्प्यात १६ हजार, असे एकूण २५ हजार रुपये मानधन मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र, जनगणनेसाठी आवश्यक नवीन मोबाइलचा खर्चच २५ हजार रुपयांच्या पुढे जात असल्याने मिळालेले मानधन मोबाइल खरेदीतच खर्च होणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले. यामुळे प्रत्यक्ष कामाचा मोबदला शून्य ठरत असल्याची खंतही बदल शिक्षकांनी व्यक्त केली. या सक्तीमुळे शिक्षकांमध्ये संताप निर्माण झाला असून, जनगणनेचे काम शासनाचे असताना त्याचा आर्थिक खर्च शिक्षकांनी का करावा, असा संतप्त सवाल शिक्षक विचारत आहेत.
