२६ जूननंतरच सुरू कराव्यात शाळा, शिक्षकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

चामोर्शी : विदर्भात सध्या वाढत्या तापमानाने कहर केला असून, पारा ४५ अंशांच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत, राज्य शिक्षण संचालनालयाने विदर्भातील शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

हा आदेश विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा असल्याची टीका करत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने हे आदेश रद्द करून शाळा २६ जूननंतरच सुरू कराव्यात, अशी मागणी शिक्षण उपसंचालकांमार्फत शासनाकडे केली आहे. शिक्षक परिषदेच्या मागणीला माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे

विद्यार्थी हिताचा निर्णय हवा

सध्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सकाळी १०:३० पर्यंतच शाळा घेण्याचे बंधन घातले आहे, यावरूनच तापमानाची तीव्रता स्पष्ट होते. विद्यार्थ्याचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेता, शाळा १५ जूनऐवजी २६ जूनपासूनच सुरू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे. या मागणीमुळे शिक्षण विभागाने वेळीच दखल न घेतल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. १५ जूनला विदर्भातील सरासरी तापमान ४५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या उष्णतेत ६ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांचे आरोग्य व जीव धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *