मुलींना देता सायकली, मग मुलांना का नाही ?

चामोर्शी, १६ जून मानव विकास मिशन योजनेंतर्गत सध्या केवळ विद्यार्थिनींना सायकली वितरित केल्या जातात तसेच मोफत बस पास सुविधा उपलब्ध आहे. मात्र, इयत्ता ८ वी ते १२ वीमध्ये शिकत असलेले, ग्रामीण व आदिवासी भागातील बाहेरगावावरून ये- जा करणारे विद्यार्थी या सुविधांपासून वंचित आहेत. मुलींना सायकली व विविध योजना दिल्या जातात आहे. मग विद्यार्थी मुलांना सायकली का नाही? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अनेक विद्यार्थी वयाच्या मर्यादिपूर्वी दुचाकी वाहन चालवतात. त्यामुळे रस्ते अपघात वाढत आहेत आणि पर्यावरणाचे प्रदूषणही होत आहे. शिक्षणात सातत्य टिकवण्यासाठी व त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. नक्षलग्रस्त, आदिवासी व दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सामाजिक विकास साधण्यासाठी, तसेच त्यांना शाळेत नियमितपणे उपस्थित राहता यावे म्हणून सायकल व इतर योजना अंमलात आणणे गरजेचे आहे.

जिल्हा खनिकर्म विभागाने विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोलीतर्फे करण्यात आली आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठान योजनेच्या माध्यमातून इयत्ता ८ वी ते १२ वीच्या बाहेरगावावरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत सायकली पुरविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना जिल्हा कार्याध्यक्ष संतोष सुरावार उपस्थित होते.
(तभा वृत्तसेवा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *