तीन वर्षांपासूनची थकीत देयके अदा
शिक्षक परिषदेतर्फे शिक्षणाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा सत्कार
अहमदनगर, ता. २ : मार्चच्या शेवटी जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे तीन वर्षापासूनची सर्व प्रकारची थकीत पुरवणी, वैद्यकीय, रजा रोखीकरण बिले व सातव्या वेतन आयोगाचे १ ते ४ पर्यंतचे थकीत हप्ते मिळाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, संध्या भोर व कार्यालय अधीक्षक सुभाष कराळे यांचा जिल्हा परिषदेत सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यासाठी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित, शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानदेव बेरड, शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवाजी घाडगे, कोषाध्यक्ष प्रसाद सामलेटी, वैभव शिंदे, बाबासाहेब गांगर्डे, गोविंद धर्माधिकारी, प्रसाद नंदे, शिक्षकेतर संघटनेचे गोवर्धन पांडुळे, अशोक जेम्स, विजया गायकवाड, आर. एम. ठाकरे आदी उपस्थित होते. शिक्षक परिषदेच्या वतीने मागील तीन वर्षांपासूनची सर्व प्रकारची थकीत देयके मिळण्याची सातत्याने मागणी सुरू होती. संघटनेच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत शिक्षणाधिकारी कडूस व वेतन पथक अधीक्षक म्हस्के यांनी मार्चच्या शेवटी सर्व बिले निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी दिलेला शब्द पाळून सर्व थकीत देयके शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवानिवृत्तांना मिळण्यासाठी सर्व देयके मंजूर करून कोषागार कार्यालयात सादर केलेली आहेत. ही सर्व देयके सर्वांच्या खात्यावर वर्ग होण्याचे काम सुरू झाले असून, त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांच्या वतीने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
” इतिहासात पहिल्यांदाच मार्चच्या शेवटी सर्व थकीत देयके मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षक यांनी केलेल्या कामाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हे शक्य झाले आहे. “
– सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष, मुख्याध्यापक संघ
“थकीत देयके मिळण्यासाठी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले आहे. संघटनेच्या मागणीला अधिकारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद देऊन काम मार्गी लावले.”
-बाबासाहेब बोडखे, शहर जिल्हाध्यक्ष, शिक्षक परिषद
