तरुण भारत
लोकशाही टिकविण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे
नरखेड, ३ एप्रिल लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीतील फार मोठा उत्सव असतो. हीच निवडणूक १९ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. या निवडणुकीत प्रत्येकाने आवर्जून मतदान करायलाच हवे. लोकशाही टिकविण्यासाठी मतदान गरजेचे आहे, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष तथा माजी आमदार नागो गाणार यांनी केले आहे. मतदानाविषयी प्रत्येक मतदारात जनजागृती व्हावी याकरिता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार नरखेड तालुक्यातील जनजागृती मोहिमेत माजी आमदार नागो गाणार यांनी लोकांशी संवाद साधत मतदान केल्याने काय फायदे होतात यावर प्रकाश टाकला.
सज्जनांची निष्क्रियता ही दुर्जनांच्या सक्रियतेपेक्षा समाजाला जास्त घातक ठरते. म्हणूनच आपण सर्वांनी मतदान करायलाच हवे. लोकशाहीत प्रत्येकाचे मत महत्त्वपूर्ण आहे. यातूनच आपण संसदेत खासदार पाठवित असतो. पुढे हेच खासदार देशाचे धोरण ठरवितात. जे देशाचे धोरण ठरवितात ते नक्कीच सर्वोत्तम असावेत. हीच अपेक्षा सर्वांची असते, पण मतदानाची वेळ आली की, मतदार सुट्या घेऊन बाहेर गावी जातात. पुढे सरकार कुठलेही निवडून आल्यावर हीच मतदान न करणारे त्यांच्या विरोधात बोलत बसतात. वस्तुतः तेव्हा बोलून काहीही फायदा होत नाही. त्यांनी तेव्हाच वेळात वेळ काढून मतदान केले असते तर नक्कीच चित्र वेगळे होणार होते. याचाही विचार आम्ही लोकांना सांगत असल्याचे माजी आमदार नागो गाणार यांनी स्पष्ट केले.
(तभा वृत्तसेवा)
