शिक्षकांच्या अर्जित रजेचे रोखीकरण व्हावे
राज्य शिक्षक परिषद : निवेदन सादर
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : खाजगी व अनुदानित शाळांतील माध्यमिक शिक्षकांना दरवर्षी १० याप्रमाणे तर संपूर्ण सेवाकाळात त्यांना ३०० पर्यंत अर्जित रजा पाठविता येतात. परंतु, त्यांचे रोखीकरण होत नाही. इतर विभागांतील कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजांचे रोखीकरण होते. त्यामुळे राज्य शिक्षक परिषद, ठाणे जिल्हा यांनी शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण उपसचिव चारुशीला चौधरी व अपर सचिव स्वप्नील कापडनीस यांना निवेदन दिले आहे.
शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याव्यतिरिक्त क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन, सहल, जयंती उत्सव यासारखे विविध कार्यक्रम राबविण्यासाठी शाळेव्यतिरिक्त वेळ द्यावा लागतो. त्यामुळे शिक्षकांना अर्जित रजा घेता येत नाहीत. तसेच परीक्षेचा निकाल तयार करणे, वही मूल्यांकन, पेपरतपासणी ही कामे त्यांना शाळेव्यतिरिक्त घरी आणून पूर्ण करावी लागतात. त्यामुळे त्यांच्या अर्जित रजा साठतात. शिक्षकांना जास्त रजा मिळतात, हा गैरसमज दूर करून त्यांच्या वेळेव्यतिरिक्त केलेल्या कामाचा आणि परिश्रमाचा मोबदला म्हणून त्यांच्या साठलेल्या रजांचे रोखीकरण व्हावे आणि निवृत्तांचे रोखीकरण सेवेत लागल्यापासून व्हावे, असे संस्थेने निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, निवेदन देताना संस्थेच्या अध्यक्षा हेमलता मुनोत, महिला आघाडीप्रमुख मनीषा चौहान, सहकार्यवाहक ओमप्रकाश सिंग चौहान आदी उपस्थित होते.
