शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी मुलाखत प्रक्रिया जाहीर
राज्य शिक्षक परिषद, पुणे विभागाच्यावतीने आयोजन
केसरी वृत्तसेवा
बलवडी (भा.)
बीआरएसएम संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पुणे विभागाच्यावतीने पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी मुलाखत प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवडणूक नोव्हेंबर २०२६ मध्ये अपेक्षित असून, त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून ही महत्त्वाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य उमेदवार निवड समितीचे प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या नेतृत्वाखाली ही मुलाखत प्रक्रिया पार पडणार आहे. दि ३ एप्रिल (शुक्रवार) रोजी पुणे येथील शिक्षक भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यावेळी सकाळी ८ ते ११ या वेळेत पुणे विभागाची कार्यकारिणी बैठक होणार असून, दुपारी १२ ते ४ या वेळेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. या प्रक्रियेद्वारे सक्षम व योग्य उमेदवारांची निवड करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पुणे विभागातील सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे जिल्हा, पिंपरी- चिंचवड तसेच पुणे महानगर या सर्व भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले मत व्यक्त करावे, असे आवाहन विभाग अध्यक्ष सुरेश राठोड व विभाग कार्यवाह बाळासाहेब चोपडे यांनी केले आहे.
मुलाखत प्रक्रिया ठराविक क्रमाने पार पडणार असून त्यामध्ये सर्वप्रथम सांगली, त्यानंतर इचलकरंजी, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड व शेवटी पुणे महानगर या क्रमाने उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.
