१८ वर्षांनी पहिला बोनस
दिवाळीनंतर पाच महिन्यांनी १८ शिक्षिकांना लाभ
वेतनवाढीसोबत इतर समस्या मात्र कायमच
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात गेली १८ वर्षे कार्यरत असलेल्या १८ पूर्व प्राथमिक शिक्षिकांना पहिल्यांदाच पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळाले. हे अनुदान या शिक्षिकांच्या खात्यात शनिवारी जमा झाले आणि त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी सेवाभावी संस्थांची नियुक्ती झाल्यानंतरही पालिकेच्या सेवेत असलेल्या या १८ शिक्षिकांना आजही तुटपुंज्या मानधनावरच काम करावे लागत असले, तरी दिवाळीनंतर पाच महिन्यांनी का होई ना, हे अनुदान मिळाल्याने त्यांना उभारी मिळाली आहे. मुंबई महापालिकेने २००७ मध्ये ११० पूर्व प्राथमिक शिक्षिकांची नियुक्ती केली होती. या शिक्षिका अंगणवाडी, बालवाडीमध्ये काम करतात. वाड्यावस्त्यांमधील शिक्षणाच्या मुख्य आणण्यापासून ने आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत अनेक कामे या शिक्षिका करतात. या शिक्षिकांना गेली १८ वर्षे पाच हजार रुपये एवढे अत्यल्प मानधन आहे. विशेष म्हणजे एवढ्या काळात ना त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आणि ना त्यांना सानुग्रह अनुदान अथवा इतर कोणत्याही सुविधा पुरवण्यात आल्या.
या कालावधीत पालिकेने या शिक्षिकांना कमी करत बालवाड्या किंवा पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी मुलांना सेवाभावी संस्थांमार्फत कंत्राटी प्रवाहात शिक्षिकांची नेमणूक केली. त्यांच्या पालिकेच्या सेवेतल्या मूळ १८ शिक्षिका वगळून आता या सर्व पूर्व प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी या कंत्राटी शिक्षिका पार पाडतात. या शिक्षिकांचे मानधनही आठ हजार रुपयांच्या आसपास असून त्यांना सानुग्रह अनुदानही दिले जाते. कंत्राटी शिक्षिकांना चांगले मानधन, मानधन वाढ आणि वर अनुदान मिळत असताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याने शिक्षिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनेही पालिका प्रशासनाकडे विनंतीपत्र देत या शिक्षिकांच्या मानधनात २० हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याची आणि त्यांना दिवाळीच्या वेळी सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती. या मागणीपैकी सानुग्रह अनुदानाची मागणी मान्य करत पालिकेने या शिक्षिकांना अनुदान दिले आहे. आता मानधनातही वाढ झाली, तर आमचे बरेच प्रश्न सुटतील, अशी भावना शिक्षिकांनी व्यक्त केली.
मुलांना शाळेपर्यंत आणण्याची, विद्यादानाची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या शिक्षकांना सानुग्रह अनुदान मिळणे ही सकारात्मक बाब असून त्यातून कामाचा हुरूप वाढेल आणि सकारात्मकता येईल, अशा भावनाही या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहेत.
दिवाळीनंतर पाच “”महिन्यांनी का होईना, पण या शिक्षिकांना पहिल्यांदाच बोनस मिळाला. पालिका प्रशासाने केलेल्या वेगवान कार्यवाहीचे कौतुक आहेच, पण त्याचसोबत पुढील काळातही या शिक्षिकांना न्याय मिळायला हवा.
– शिवनाथ दराडे,
मुंबई कार्यवाह, महाराष्ट्र
राज्य शिक्षक परिषद
