*महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याकरिता समाज परिवर्तनाची आवश्यकता :
माननीय श्री नागो गाणार*
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर शहर तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त “महिला सन्मान सोहळा” दिनांक ८ मार्च 2026 ला सकाळी 11:00 वाजता लोकांची शाळा सिरसपेठ नागपूर येथे थाटात संपन्न झाला.
सौ. रंजना कावळे अध्यक्ष (प्राथ.) नागपूर विभाग यांनी प्रास्ताविकात महिला दिन साजरा करण्यामागील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची भूमिका स्पष्ट केली. मा. सौ. मीनल गाणार यांनी महिला सन्मान दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करून शुभेच्छा दिल्या. मा. सौ. गौरी बेलन ( संचालिका योगायोग विवाह संस्था) स्त्रियांना स्व रक्षणासाठी प्रेरित करणाऱ्या अनेक कर्तुत्ववान महिलांचे दाखले देऊन उंच भरारी घेतली तरी संसार सोडू नका असा सुसंस्कृत सल्ला महिलांना दिला. मा. डॉ. सौ. तृप्ती गावंडे (सीनियर फिजिओथेरपीस्ट) यांनी स्नायूंच्या मजबूतीसाठी नियमित व्यायाम किंवा फिजिओथेरपी किती आवश्यक आणि उपयुक्त आहे हे प्रात्यक्षिका द्वारे सांगितले. राज्य महिला आघाडी प्रमुख सौ पूजा चौधरी यांनी विविध क्षेत्रात भरारी घेतलेल्या आपल्या विद्यार्थ्यांनींन विषयी परिचय देऊन अभिमान व्यक्त केला व शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथी मा. सौ. रजनी राजूरकर (मुख्याध्यापिका लोकांची शाळा ) ” जेथे स्त्रियांचा सन्मान होतो, तेथेच परमेश्वर वास करतो” अशी स्त्रियांची महत्ती व्यक्त केली. मा. डॉ. सौ. मनिषा कोलारकर यांनी आचार्य विनोबा भावे व साने गुरुजी यांच्या जीवनातील प्रसंग सांगून “देतो तो देव, राखतो तो दानव” या युक्तीसह प्रेरक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती डिंपी बजाज (नागपूर शहर महिला आघाडी प्रमुख) यांनी आध्यात्मिक व पौराणिक कथा आणि सुंदर कविता यातून महिलांच्या सध्या स्थितीचे परखड विचार मांडले. परिषदेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी स्वागत गीत तर सौ. राणी सेलोकर यांनी स्त्रीशक्ती गीत सादर केले.
सौ. सुरोसे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि अल्पोपहार नंतर सोहळा संपन्न झाला.
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंधेला दिनांक 7 मार्च 2026 रोजी पंडित नेहरू हायस्कूल, जगदीश नगर, काटोल रोड येथे समाजसेविका, नगरसेविका व शिक्षिका यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेद्वारे महिला दिन साजरा करण्यात आला.
