देशात १० वर्षांत ९३ हजार शाळा बंद

नवी दिल्ली : देशातील शिक्षण व्यवस्थेची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. मागील दहा वर्षांत  देशभरातील ९३ हजारांहून अधिक शाळा बंद झाल्या आहेत. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. राजस्थानमधील सीकरचे सीपीआय (एम) खासदार अमराराम यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता.

सरकारी डेटानुसार, २०१४- १५ ते २०१९-२० या सहा वर्षांत देशभरात तब्बल ७० हजारांहून अधिक शाळांवर टाळे लागले, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. कोव्हिड काळात आणि त्यानंतरच्या वर्षांत म्हणजे २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीतही सुमारे १८,७०० पेक्षा जास्त शाळा बंद झाल्या. म्हणजेच वेग थोडा कमी झाला असला, तरी शाळा बंद होण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबलेली नाही.

उत्तर प्रदेशात सर्वाधिक सुमारे २४,६०० शाळा बंद झाल्या आहेत. त्यानंतर मध्य प्रदेशात २२,४०० शाळा बंद करण्यात आल्या. ओडिशा- सुमारे ५,४०० शाळा, झारखंड ५,००० हून अधिक शाळा, राजस्थान -२,५००  पेक्षा जास्त  शाळा बंद झाल्याची माहिती मिळतेय.

 

मोठ्या राज्यांतही शाळांची संख्या घटली

■ महाराष्ट्र, बिहार, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यांतही शेकडो ते हजारो शाळा बंद झाल्या आहेत. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये एकूण शाळांच्या संख्येत चढ-उतार दिसून आला असला तरी अखेरीस सुमारे एक हजार शाळा कमी झाल्या आहेत. जम्मू-कश्मीरमध्येही चिंताजनक स्थिती

■ अलीकडील काळात म्हणजे २०२०-२१ ते २०२४- २५ दरम्यान मध्य प्रदेशात सुमारे ६,९०० शाळा बंद झाल्या, तर जम्मू-कश्मीरमध्ये जवळपास ४,४०० शाळा बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही या कालावधीत एक हजाराहून अधिक शाळांवर परिणाम झाला आहे. महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशातही शेकडो शाळा बंद झाल्याची नोंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *