सीटीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

निवडणूक आयोगाचा दिलासादायक निर्णय

तभा वृत्तसेवा

धाराशिव, दि. ४ फेब्रुवारी –

राज्यातील बारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १२५ पंचायत समिती निवडणुकांच्या मतदानाच्या तारखेमध्ये बदल झाल्यानंतर सीटीईटी परीक्षा देणाऱ्या हजारो शिक्षकांची मोठी कोंडी झाली होती. मतदानाचा दिवस आणि परीक्षा एकाच दिवशी म्हणजे ७ फेब्रुवारी रोजी आल्याने राज्यभर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

या गंभीर बाबीची दखल घेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेनुनाथ कडू यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह राज्य निवडणूक आयोगाकडे तातडीने निवेदन सादर करून सीटीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट देण्याची मागणी केली होती. तसेच यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

या मागणीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (ता. ३) सीटीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट देण्याचा निर्णय घेत मोठा दिलासा दिला. याबाबत संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देऊन पर्यायी व्यवस्था करण्याबाबतही योग्य सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यासह अन्य अकरा जिल्ह्यांतील हजारो शिक्षकांची निवडणूक कामातून मुक्तता होणार असून, शिक्षकांना बंधनकारक असलेली सीटीईटी परीक्षा आता शांत आणि स्थिर मनाने देता येणार आहे.

या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेनुनाथ कडू, माजी आमदार नागोराव गाणार, माजी आमदार भगवानराव साळुंखे, राज्य कार्याध्यक्ष उमाकांत कुलकर्णी, सुनिल काळे, कुमार निकम, सुरज येवले, अभिमान पेठे, अमोल गायकवाड, आप्पासाहेब गाडेकर, आण्णासाहेब धावारे, एस.जी. भोगील आदींनी स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *