निवडणूक आयोगाचा शिक्षकांना दिलासा; सी-टीईटीसाठी सूट
। सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ४ : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा धुरळा उडालेला असतानाच, निवडणूक आयोगाने गुरुवारी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (ता.७) होणारे मतदान आणि त्याच दिवशी असणारी सी-टीईटी परीक्षा यामुळे हजारो शिक्षकांची मोठी कोंडी झाली होती. अखेर परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्त करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे परीक्षार्थी शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख ७ फेब्रुवारी निश्चित केली होती. मात्र, नेमक्या याच दिवशी केंद्र सरकारच्यावतीने घेतली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर झाली होती. अनेक शिक्षकांनी या परीक्षेसाठी अर्ज केले होते. निवडणूक कर्तव्य बजावणे अनिवार्य असल्याने, शिक्षकांसमोर आपली महत्त्वाची परीक्षा सोडण्याची वेळ आली होती. यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रमाचे आणि चिंतेचे वातावरण होते.
दरम्यान, या गंभीर प्रश्नावर शिक्षक संघटनांनी राज्य निवडणूक आयोगाचे दार ठोठावले. परिषदेच्या वतीने लेखी निवेदन देऊन शिक्षकांना या कर्तव्यातून सूट देण्याची आग्रही मागणी केली. आयोगाने या मागणीची दखल घेत मंगळवारी (ता. तीन) याबाबतचा आदेश देत शिक्षकांना दिलासा दिला. जे शिक्षक शनिवारी सी- टीईटी परीक्षा देणार आहेत, त्यांना निवडणूक कामातून सूट देण्यात यावी. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी अशा शिक्षकांच्या जागी तातडीने पर्यायी कर्मचारी नियुक्त करून निवडणुकीची व्यवस्था करावी, असे आदेश आयोगाने दिले आहेत.
धाराशिवसह ११ जिल्ह्यांना फायदा
या निर्णयामुळे जिल्ह्यात कार्यरत एक हजारावर शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता हे शिक्षक कोणत्याही मानसिक दबावाशिवाय आपली पात्रता परीक्षा देऊ शकणार आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेनुनाथ कडू, माजी आमदार नागोराव गाणार, भगवान साळुंखे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
