‘टीइटी’ विरोधाचा शिक्षकांचा सूर
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी), संच मान्यता निकष आणि जुनी पेन्शन योजना यांसारख्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबई विभागाचे ४३ वे वार्षिक अधिवेशन दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सुमारे एक हजारांहून अधिक शिक्षकांनी उपस्थिती लावून संघटनेची एकजूट दाखवून दिली.
अधिवेशनाचे उद्घाटन माजी शिक्षक आमदार व शिक्षणतज्ज्ञ नागोजी गाणार यांच्या हस्ते झाले. राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मागील ४२ वर्षांपासून परिषदेकडून नियमित अधिवेशनांचे आयोजन केले जात असून शिक्षक व शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करून शासनदरबारी पाठपुरावा केला जातो. यावेळी संजय उपाध्याय यांनी परिषदेच्या ६६ वर्षांच्या कार्याचा गौरव करत शिक्षणातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. नागोजी गाणार यांनी टीईटी संदर्भातील अडचणी, संच मान्यतेचे जाचक निकष, बंद पडणाऱ्या मराठी शाळांचा प्रश्न आणि जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याची मागणी मांडली. संबंधित विषयांवर ठराव मंजूर करून शासनाकडे पाठपुराव्यासाठी सह्या संकलित करण्यात आल्या.
मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी कार्यअहवाल सादर करत सर्व गट-तट विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले. अध्यक्ष सुहास हिर्लेकर यांनी आभार मानले. अधिवेशनानिमित्त ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचे सादरीकरण व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला.
शिक्षक परिषदेच्या अधिवेशनात ठरावांचा वर्षाव
४३ वे वार्षिक अधिवेशन दादरमध्ये उत्साहात
१ हजारांहून अधिक शिक्षकांची उपस्थिती
