शिक्षकांचा टीईटीविरोधी ठराव
महाराष्ट्र राज्य परिषदेच्या मुंबई विभागाचे अधिवेशन उत्साहात
मुंबई, ता. १५ महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागाचे ४३वे वार्षिक अधिवेशन दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात शनिवारी (ता. १४) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या अधिवेशनात एक हजारहून अधिक शिक्षकांनी उपस्थित राहून संघटनेची ताकद व एकजूट अधोरेखित केली. या वेळी शिक्षकांनी टीईटीविरोधी ठराव मंजूर केला.
अधिवेशनाचे उद्घाटन माजी शिक्षक आमदार तथा शिक्षणतज्ज्ञ ना. गो. गाणार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या ४२ वर्षांपासून परिषदेमार्फत नियमितपणे वार्षिक अधिवेशन आयोजित केले जाते. या व्यासपीठावर शिक्षक व शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करून ठराव मंजूर केले जातात व शासनदरबारी त्यांचा सातत्याने पाठपुरावा केला जातो. या वेळी संजय उपाध्याय यांनी परिषदेच्या ६६ वर्षांच्या सातत्यपूर्ण व प्रामाणिक कार्याबद्दल कौतुक केले. शिक्षण क्षेत्रातील वाढत्या भ्रष्टाचाराबाबत त्यांनी चिंता व्यक्त करीत, त्याविरोधात सर्वांनी एकत्रितपणे लढा उभारण्याचे आवाहन केले. गाणार यांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी), संच मान्यतेचे जाचक निकष, आश्वासित प्रगत योजना तसेच राज्यभरात बंद पडत असलेल्या मराठी शाळांचा प्रश्न यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या हक्कांसाठी ठोस भूमिका घेत त्यांनी टीईटीसंदर्भातील अडचणी दूर करण्याची, जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याची आणि संच मान्यतेबाबतचे शासन आदेश रद्द करण्याची मागणी केली. संबंधित विषयांवर ठराव मंजूर करून शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सह्या संकलित करण्यात आल्या.
टीईटीबाबत कोणताही स्पष्ट शासन निर्णय नसताना काही अधिकारी स्वतंत्र निर्णय घेत असल्याचा आरोप गाणार यांनी केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठासमोर पुनर्विचार याचिका प्रलंबित असल्याची माहिती त्यांनी दिली.
एकत्र या!
मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सर्व गट-तट विसरून शिक्षकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. अधिवेशनानिमित्त ‘ऑल ‘द बेस्ट’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक व संस्थांचा सत्कार करण्यात आला.
