गडचिरोली, ब्युरो.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्या वतीने ५ डिसेंबरला नागपूर येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाला राज्यातील सर्व शिक्षक परिषदेसह सर्वांनी तत्कालीन परिस्थितीत विरोध करण्यात आला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी एकही शाळा बंद होणार नाही असे अभिवचन सभागृहात दिले. परंतु प्रत्यक्षात राज्यात २०२४- २०२५ ची पटसंख्या विचारात घेऊन संच निर्धारण करण्यात आले व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या एक हजार पेक्षा जास्त शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे. तसेच एक हजार नऊशे शाळा या एक शिक्षकी झाल्या आहेत. सभागृहात दिलेल्या आश्वासनाकडे पाहता फार मोठी विसंगती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षक परिषदेच्या वतीने नागपूर येथे ५ डिसेंबरला मोर्चा तसेच धरणा आंदोलन पुकारण्यात आला आहे. या आंदोलनात बहूसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन करीत मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभागीय कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी दिला आहे.
