मिरजेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा शिक्षक निर्धार मेळावा उत्साहात

शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा निर्धार

केसरी वृत्तसेवा

मिरज : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पुणे विभाग व सांगली जिल्हा ग्रामीण, सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्र यांच्या वतीने पुणे विभाग शिक्षक मतदार संघ विधान परिषद निवडणूक २०२६ च्या निमित्ताने भव्य शिक्षक निर्धार मेळावा रविवारी मिरजेतील शेतकरी भवन येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांत अध्यक्ष वेणूनाथ कडू यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात झाला.

वेणूनाथ कडू म्हणाले की, आजच्या शैक्षणिक प्रशासनात अनेक गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यावर जुजबी कारवाई करून नंतर त्यांना उच्च पदावर प्रमोशन दिले जाते हे अत्यंत निंदणीय प्रकार घडत आहेत.

याला प्रश्नांची जाण नसलेले शिक्षक आमदार जबाबदार आहेत. अशा ठिकाणी शिक्षकांच्या प्रश्नांची व शैक्षणिक प्रशासनाची जाण असणारे शिक्षक परिषदेचे उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे. यासाठी कोणत्याही परिस्थितीत पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार प्रांत अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, आजपर्यंत विधानपरिषदेत प्रतिनिधित्व केलेल्या शिक्षक परिषदेचे ९ माजी आमदारांनी अत्यंत प्रभावीपणे व प्रामाणिकपणे काम केले. त्यांना मुंबई सारख्या राजधानी शहरात स्वतः चे घर बांधता आले नाही. बसने प्रवास करुन काम केले. अशा प्रकरचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार शोधून सापडणे दुर्मिळ आहे. यासाठी शिक्षक चळवळीत योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारा शिक्षकच

उमेदवार देणार असल्याची घोषणा कडू यांनी केली.

आता निवडणुकांचा हंगाम सुरू झाला असून अनेक इच्छुक उमेदवारांकडून अनेक ठिकाणी शिक्षकांना आदर्श पुरस्कार देण्याचे सेल सुरू होतील. यापासून सावध राहा. यामुळे प्रामाणिकपणे काम करणारा  शिक्षक दूरच राहतो. शिक्षक परिषदेचे सदस्य पदाधिकारी हे शिक्षकांच्या सर्व प्रकारच्या समस्यांची जाण असणारे शिक्षक आहेत. ते जणू सर्व रोगनिदान शिबिरातील डॉक्टर सारखे काम करतात. अनेक वर्षे सेवा देणाऱ्या शिक्षकांवर टीईटी सारख्या सक्तीच्या परीक्षा लादून शिक्षकांवर एक प्रकारे अन्याय केले जात आहे.

हे धोरण राबवले जाणार असेल तर बालवाडी पासून ते दहावी पर्यंतच्या सर्व वर्गांच्या शाळांना अनुदान द्यावे लागेल, असे स्पष्ट इशारा कडू यांनी दिला. अशा सर्व समस्यांवर मात करण्यासाठी शिक्षक परिषदेचे  अभ्यासू उमेदवार जाहीर केले जातील. शिक्षक परिषदेला विचारात न घेता कोणत्याही राजकीय पक्षाने

उमेदवारी लावल्यास तो मान्य केला जाणार नाही असा इशारा शेवटी कडू यांनी दिला.

माजी आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले, शिक्षक परिषदेच्या माध्यमातून सर्व मतदार संघात मतदार नोंदणी साठी झोकून देऊन काम करा. वैचारीक बांधिलकी जोपासणारे शिक्षक परिषदेचे उमेदवार उभे

केले जाणार असून जो उमेदवार देतील तो निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करा, असे

आवाहन साळुंखे यांनी केले. या सभेत राज्यसंघटन मंत्री किरण भावठणकर यांनी संघटनेचा कार्य परिचय करून दिला. मतदान नोंदणी आढावा कार्याध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी घेतला. सातारा, सांगली,

सोलापूर व पुणे याठिकाणी मतदार नोंदणीसाठी सुमारे २५ हजारहून अधिक नोंदणी फॉर्म उपलब्ध करून दिले असल्याचे सांगितले.

बुथ रचनेची माहिती राज्य  कार्यवाह राजकुमार बोनकिले यांनी दिली. दरम्यान मुक्त चिंतन वेळेत जी. एस. आप्पा, कोले सर यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत सुरेश राठोड यांनी केले तर प्रास्ताविक राजेंद्र नागरगोजे यांनी केले. सूत्रसंचलन सुशांत पाटील यांनी केले, आभार कार्यवाह बाळासाहेब चोपडे यांनी मानले.

<img src=”“>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *