टी.ई.टी परीक्षेबाबत शिक्षकात रोष
राजेंद्र सूर्यवंशी: रोष संपुष्टात आणावा : शिक्षक परिषदेची मागणी
महादेव पाटील : कुरळप

व्यक्तीपासून ते देशापर्यंतच्या प्रगतीचा मूळ पाया हा शिक्षण आहे. शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी प्राथमिक शिक्षण मूल्यवर्धित व भरीव स्वरूपाचे पोहोचवणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांना फक्त अध्यापनाचेच काम देण्यात यावे, याव्यतिरिक्त शिक्षकावरती कोणत्याही इतर कामांचा बोजा न ठेवता त्यांना फक्त अध्यापनाचेच काम द्यावे. त्यामुळे शिक्षणाचा पाया मजबूत होत जाईल. परंतु सरकारचे शैक्षणिक धोरण शैक्षणिक कार्यात अडसर निर्माण करणारे झाले आहे. टीईटी परिक्षेबाबत सरकारचे धोरणे चुकीचे असून त्या बाबतीत शिक्षण समुदायात रोष निर्माण झालेला आहे. टी.ई.टी बाबत शिक्षण समुदायात निर्माण झालेला रोष संपुष्टात आणावा, अशी मागणी शिक्षक परिषदेतर्फे राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयानुसार टी.ई.टी. बाबत शिक्षण समुदायात निर्माण झालेला रोष संपुष्टात आणण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्या वतीने सातत्याने मागणी होत आहे. त्या मागणीचा विचार करून सरकारकडून शिक्षकांच्या बाबतीत विचार करणे गरजेचे आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम या केंद्र शासनाच्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्यात आली आहे. त्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने राज्यशासनाने या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या हेतुने महाराष्ट्र शासनाने इयत्ता १ ली ते ८ वी ला शिकविणाऱ्या शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यवसायिक पात्रतेसह टी.ई.टी ही किमान पात्रता २०१३ पासून बंधकारक केली. तसेच दि १३ फेब्रुवारी २०१३ पूर्वी सेवेत असणाऱ्या शिक्षकांना यातून सूट दिली.

शिक्षक समुदायात प्रचंड रोष

सर्वोच्च न्यायालयाने टी.ई.टी संदर्भात दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निवाड्यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात प्रामुख्याने इयत्ता १ ली ते ८ वी ला शिकविणाऱ्या शिक्षक समुदायात प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. शिक्षक समुदाय भीतीचे वातावरण पसरले आहे. शिक्षक निराशेच्या मानसिकतेत अध्यापनाचे काम करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कदाचित अध्यापनाच्या कार्यामध्ये विस्कळीतपणा येऊ शकतो. कोणतेही काम, कार्य जर दबावाखाली होत असेल तर साहजिकच त्या कामात त्रुटी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षक हा कोणत्याही दबावाखाली अध्यापनाचे काम करू नये याकरिता शासन स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे.

अशैक्षणिक कामे
आता शिक्षण सेवेत असलेले सर्व शिक्षक शिक्षक सेवेत आल्यावर शासनाच्या शैक्षणिक गुणवता वाढ या अनुषंगाने शासनाने आयोजित शिक्षक प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. त्यातून सध्य स्थितीस आवश्यक गुणवता प्राप्त करत अध्यापन करत आहेत. शिक्षकांना अध्यापना बरोबर अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. यामध्ये प्रामुख्याने बीएलओचे काम निवडणूक अनुषंगिक ड्युटी, वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण, शालेय माध्यन्ह भोजन योजना अंमलबजावणी, अशी अनेक काम शिक्षक करत आहेत..

राज्याने केंद्राकडे पाठपुरावा
सर्वोच्च न्यायालयाने टी.ई.टी संदर्भात दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निकालामुळे सर्व शैक्षणिक व अशैक्षणिक कामे करत टी.ई.टी. परीक्षा देणे शिक्षकांसाठी संयुक्तिक नाही. म्हणून राज्य शासनाने टी.ई.टी. संदर्भात केंद्र पातळीवर पाठपुरावा करून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने घटनात्मक आणि कायदेशीर भूमिका घोषित करणे अत्यावश्यक व निकडीचे आहे. याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *