शिक्षक परिषदेच्या न्याय मागण्यांसाठी खंबीरपणे उभे राहू

आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन

महाराष्ट्र राज्य शिक्षक

परिषदेचे अधिवेशन

चंद्रपूर, ३० मार्च

बदलत्या काळात नवी आव्हाने उभी राहत असून, आजच्या युगात तंत्रज्ञान विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण क्षेत्रावर प्रभाव टाकत आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आवश्यक असला तरी त्याच्या आहारी न जाता संस्कार, मूल्ये आणि मानवी संवेदनांचा आधार कायम ठेवणे गरजेचे आहे. शिक्षक परिषद ही संघटना नेहमी व्यक्तिहितापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य देणारी असून,  शिक्षक परिषदेच्या प्रत्येक न्याय्य मागण्यांसाठी आपण खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

चंद्रपूर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, नागपूर विभागाच्या अधिवेशनाला ते संबोधित करीत होते. यावेळी विभाग अध्यक्ष अध्यक्ष अजय वानखेडे, माजी शिक्षक आमदार नागो गाणार, माजी आमदार सुधाकर कोहळे, राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू, पूजा चौधरी, सुभाष गोतमारे, विलास खोंड, विनोद पांढरे, रंजना कावळे आदींची उपस्थिती होती.

मुनगंटीवार यांनी, शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी लवकरच चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी सभागृहात शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, शिक्षण विभागाचे सचिव देओल, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि सर्व संबंधितांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा केली. नागो गाणार यांनी आज शिक्षक संघटनेला अधिक बळकट करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवणे कठीण होणार आहे. त्याची झळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाच बसणार आहे. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संघटना बळकट करण्याची आणि विश्वसनीय नेतृत्व निर्माण करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.

संचालन वैशाली तनके यांनी, प्रास्ताविक विभाग उपाध्यक्ष विनोद पांढरे यांनी केले. आभार संयोजक विलास खोंड यांनी मानले. अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी वंसत वडस्कर, विपीन मानकर, विवेक आंबेकर, दिलीप मॅकलवार, विठ्ठल राजुरकर, संतोष सोनवणे, सरीता सोनकुसरे, संजय उपाध्ये, देविदास चवले आदींनी परिश्रम घेतले. अधिवेशनाला विदर्भातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *