शिक्षक पदे मंजुरीत सुधारणा करा

→ मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. विद्यार्थी संख्या कमी झाली तरी कुठलीही शाळा बंद केली जाणार नाही, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी कमी पटसंख्येच्या शाळेत शिक्षक पदे मंजूर करण्यासाठी अशैक्षणिक शासन निर्णय १५ मार्च २०२४ मध्ये त्वरित सुधारणा करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्यकार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. विद्यार्थी संख्या कमी झाली तरी कुठलीही शाळा बंद केली जाणार नाही. राज्यात सध्या एकूण एक लाख आठ हजार शाळा आहेत. त्यापैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. तरीसुद्धा त्या शाळा सुरूच राहतील अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २ जुलै २०२५ ला विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात केली. परंतु त्यानंतर अजून पर्यंत त्याबाबतीत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने १५ मार्च २०२४ च्या निर्णयामध्ये सुधारणा करावी, अशी मागणी माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *