शिक्षकांची पदभरती कधी ?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील तब्बल १८ हजार शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याची परिस्थिती कायम असताना शिक्षण खात्याने नियुक्त्यांबाबतची स्पष्ट रूपरेषा अद्याप जाहीर केलेली नाही. रिक्त पदांवर कोणती ठोस हालचाल होणार याबाबत सरकार शांत की, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने उपस्थित केला आहे. याच दरम्यान २० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांबाबत विलीनीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळाल्याच्या चर्चांमुळे पालक आणि शिक्षकांमध्ये वाढती अस्वस्थता आहे. शिक्षक नसल्याने आणि सुविधा अपुऱ्या असल्याने विद्यार्थी घटत असताना शाळाच बंद करण्याचा पर्याय प्रशासन पुढे करत असेल, तर ते शाळांच्या मूळ समस्यांवर पांघरूण घालण्यासारखे आहे, असे मत शिक्षक संघटनांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, शाळांची ही स्थिती लक्षात घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन जुलै रोजी विधान परिषदेत एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना या शाळा सुरूच राहतील, अशी ग्वाही दिली होती.
या अंमलबजवाणीसाठी १५ मार्च २०२४च्या शासन निर्णयात सुधारणा करून २०पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १८ हजार शाळांमध्ये शिक्षक पदे मंजूर करणे अत्यावश्यक असल्याचे शिक्षक परिषदेने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा प्रश्न
‘सरकार वास्तवापासून दूर’
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सरकारच्या भूमिके वर थेट प्रश्न उपस्थित करत तीव्र प्रतिक्रिया दिली. राज्यातील १८ हजार शाळांमध्ये शिक्षकांचीच कमतरता असताना शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल बोलणे हे सरकार वास्तवापासून दूर गेल्याचे द्योतक आहे, असे ते म्हणाले.
