राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा : नागो गाणार
नागपूर : शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी व माजी शिक्षक आमदार नागो गाणार.
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. १ महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने ३१ ऑक्टोबर काळा दिवस पाळून माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या नेतृत्वात राज्यातील सर्व जिल्हे व विभाग स्तरावरून शासनाला सादर करण्यात आले.
राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित शाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांना सेवाशर्ती नियमावली १९८१ मधील नियम क्रमांक १९ नुसार देय असलेल्या जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित करून नवीन परिभाषित अंशदान पेन्शन योजना (डीसीपीएस) लागू करण्याचा शासन निर्णय ३१ ऑक्टोबर २००५ ला निर्गमित करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने ३१ ऑक्टोबर हा दिवस काळा दिवस पाळण्याचे घोषित केले आहे. या अनुषंगाने शिक्षक कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडणारे निवेदन शासनाकडे सादर करण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हे व विभाग स्तरावरून ही निवेदने शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालकांचमार्फत शासनाकडे सादर करण्यात आले आहे. शिक्षक कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधकारम्य करणारा शासन निर्णय ३१ ऑक्टोबर २००५ रद्द घोषित करून सर्वाना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी मराशिप राज्य कार्याध्यक्ष व माजी शिक्षक आमदार नागो गाणार, राज्य महिला आघाडीच्या प्रमुख पूजा चौधरी, नागपूर विभागच्या अध्यक्षा रंजना कावळे, नागपूर विभागचे कार्याध्यक्ष सुनील चिचघरे, नागपूर विभाग कार्यवाह हेमंत बेलखोडे, नागपूर जिल्हा अध्यक्ष सतीष कसरे, नागपूर जिल्हा कार्यवाह अतुल टेकाडे, राहुल शेंदरे, कवडू गुलाबे, गुणवंता उचीतकर, श्याम जाऊळकर, वसंत हिवसे व इतर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
