मराशिपतर्फे मतदार जनजागृती
चामोर्शी, (ता. प्र. ) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोलीतर्फे मतदार जनजागृती मेळावा जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शीच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात पोलिस उपनिरीक्षक
राधा शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या महिला आघाडी प्रमुख मृणाल तुम्पल्लीवार, प्रमुख अतिथी म्हणून अॅड. प्रेमा आईचवार, आरती भिमनवार, कोमल सेलूकर उपस्थित होत्या. याप्रसंगी पीएसआय शिंदे यांनी स्त्रियांवरील अत्याचार व त्याचे निर्मूलन यावर मार्गदर्शन केले. अॅड. प्रेमा आईंचवार यांनी स्त्रियांवरील कायदे यावर प्रकाश टाकला. आरती भिमनवार यांनी महिला सक्षमीकरण यावर भाष्य केले. मृणाल तुम्पल्लीवार यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेत महिलांचे योगदान व मतदार जनजागृती बद्दल मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण करून पोलिस उपनिरीक्षक म्हणून काम करीत असलेल्या शिंदे त्याचप्रमाणे कवयित्री भारती तितरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते मतदार जनजागृती पत्रकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नम्रता मारतीवार यांनी केले. आभार कुसुम सावसागडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार, जिल्हाध्यक्ष नुतीलकंठावार, जिल्हा कार्यवाह सागर आडे व समस्त जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
