सीसीटीव्ही निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी

बोर्ड परीक्षा तणावमुक्त पार पाडण्यासाठी संघटनांचे सहकार्य आवश्यक : आमदार साळुंखे

केसरी वृत्तसेवा

बलवडी (भा.) : इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा तणावमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षक संघटना संपूर्ण सहकार्य करतील, असे मत माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी व्यक्त केले. ते माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, विभागीय कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित संघटना सविचार सभेत बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार साळुंखे म्हणाले की, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक असली तरी सीसीटीव्ही बसविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना शासन व मंडळाने पुनर्विचार करावा. सीसीटीव्ही बसविण्यासाठी लागणारा निधी परीक्षा केंद्रांवर टाकण्याऐवजी मंडळानेच उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम भूमिका यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागाच्या वतीने बुधवार, दि. ४ फेब्रुवारी २०२० रोजी कोल्हापूर विभागातील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परीक्षा प्रक्रियेतील अडचणी, शिक्षकांवरील ताण, सुरक्षितता, मानधन आदी विषयांवर सखोल व सकारात्मक चर्चा झाली.

बैठकीत रनरसोबत पोलीस कर्मचारी देण्यात यावेत, सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त असावा, परिरक्षक व पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ करावी, तसेच पर्यवेक्षकांना १५० पेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासणीसाठी देऊ नयेत, अशा विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर, सचिव सुभाष चौगुले, सहसचिव श्री. किल्लेदार, सहाय्यक सचिव उकिर्डे, पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, सांगली जिल्हा अध्यक्ष संजय पाटील, उदय पाटील, कोल्हापूर जिल्हा कार्यवाह कृष्णात पोतदार, सांगली जिल्हा कार्यवाह रमेश कोष्टी, गोविंद लवटे, सुधाकर निर्मळे, मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील, बी. बी. पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *