पीएम श्री शाळांच्या धर्तीवर महाराष्ट्रात सीएम श्री शाळा

डॉ. पंकज भोयर : राज्यात अतिवृष्टी
आंदोलनाची भूमिका घेऊ नका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या शैक्षणिक सुविधेत व गुणवत्तेत सुधारणा व्हावी यादृष्टीने पीएम श्री शाळांच्या धर्तीवर महाराष्ट्रात सीएम श्री शाळा अभियान हाती घेत असल्याचे सूतोवाच शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी बुधवारी येथे केले.

रविभवन येथे विविध शैक्षणिक संस्था व संघटनांच्या शिक्षक प्रतिनिधीसमवेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला. याचबरोबर शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर, सहायक संचालक दिपेंद्र लोखंडे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटना, विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती संघटना, खासगी शाळा शिक्षक संघ, अंजुमन इशादए तालीब संस्था, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सीएम श्री शाळा या अभियानाद्वारे शासकीय शाळांबद्दल सुविधा व गुणवत्तेच्या माध्यमातून नवा विश्वास निर्माण होईल. यात शासन मूलभूत, भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासमवेत शिक्षकांनाही आवश्यक ते प्रशिक्षण देऊन व्यापक परिवर्तन साध्य करू इच्छित असल्याचे राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले. राज्यात अतिवृष्टीमुळे सर्व जिल्हे विविध आव्हांनाना सामोरे जात आहेत. शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासन शेतकऱ्यासमवेत खंबीरपणे उभे असून सर्वांनी शेतकऱ्यांसोबत तेवढ्याच खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे, तेव्हा शिक्षकांनी अशा स्थितीत आंदोलनाची भूमिका घेऊ नये,असे आवाहन आवाहन त्यांनी केले.

टीईटी परीक्षेबाबत रिव्ह्यूव पिटीशन दाखलकरण्याबाबत निर्णय घेऊ
१३ फेब्रुवारी २०१३ च्या शासन निर्णयानुसार राज्यात शिक्षकांसाठी धोरणात्मक बाब म्हणून टीईटी परीक्षा अनिवार्य केली आहे. या बाबत विविध शिक्षक संघटनांनी व्यक्त केलेल्या मतानुसार व मागणीनुसार हा निर्णय २०१३ पूर्वीच्या शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे न्यायोचित होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत नुकत्याच दिलेल्या निकालाचा विचार करून शासनातर्फे रिव्ह्यूव पिटीशन दाखल करण्याबाबत लवकरच वरिष्ठ पातळीवर विचार विनिमय करून निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *