निकष पूर्ण न करणाऱ्या शाळांना ‘इंटरनॅशनल‘, ‘ग्लोबल‘ शब्द लावण्यास शिक्षण विभागाची मनाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील अनेक खासगी शाळांनी पात्रता निकष पूर्ण केले नसतानाही ‘ग्लोबल’, ‘इंटरनॅशनल’, ‘सीबीएसई इंग्लिश मीडियम’ अशी नावे लावली आहेत. ही कृती बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत त्यांच्या नावात बदल करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पानझडे यांनी याबाबत माहिती दिली.
शिक्षण विभागाच्या राज्य प्राधिकरणाकडे नावांबाबत येणाऱ्या अनेक प्रस्तावांमध्ये शाळांची नावे, माध्यम व मंडळ संलग्नता यामध्ये तफावत आढळून येत आहे. काही शाळा राज्य मंडळाशी संलग्न असताना त्यांच्या नावात ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’, ‘सीबीएसई’ अशा शब्दांचा वापर करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्षात अशा शब्दांचा वापर करण्यासाठी संबंधित शाळेची आंतरराष्ट्रीय पातळीवरील संलग्नता असणे आवश्यक आहे.
पालकांची दिशाभूल होते
१ परवानगी नसतानाही नावापुढे असे शब्द लावले जातात, असे शिक्षण विभागाला तपासणीमध्ये आढळून आले. या प्रकारांमुळे पालक व विद्यार्थ्यांची दिशाभूल होण्याची शक्यता असून समाजावर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
૨ नाव अधिकृत नसेल तर संबंधित शाळांना नाव बदलण्याबाबत सूचना देण्याचा निर्णय १० डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांच्या नावांबाबतही क्षेत्र स्तरावर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले असून नव्याने आलेल्या ११ प्रकरणांचे फेरप्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.
सर्व अधिकाऱ्यांना सक्त सूचना
यापुढे शाळांच्या नावाबाबत पालक आणि विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होईल अशी नावे आढळल्यास तातडीने ती नावे बदलण्याबाबत सबंधित शाळांना कळविण्यात यावे.
अशा शाळांची शिफारस राज्य प्राधिकरणाकडे करण्यात यावी.
अशा घटना क्षेत्रस्तरावरील सर्व अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापनाने आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्याव्यात.
<img src=”
“>