नंदुरबारचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे निलंबित
आमदार किशोर दराडे यांच्या तारांकित प्रश्नावरच्या चर्चेअंती शिक्षणमंत्र्यांचा निर्णय
नाशिक, ता. १० : बोगस शालार्थ आयडी प्रकरणी ‘एसआयटी स्थापन करण्यात आलेली असताना बेहिशोबी मालमत्ता व शिक्षकांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी नंदुरबारचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांना निलंबित करण्यात आले आहे. शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी बुधवारी (ता. १०) विधानपरिषदेत याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केल्यामुळे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी हा निर्णय अधिवेशनात घोषित केला. माध्यमिक शिक्षणाधिकारी अहिरे हे २०२० मध्ये पुणे येथे उपसंचालक पदावर असताना शिक्षकांची आर्थिक लूट केली. यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. तसेच ४ जुलै २०२४ रोजी प्रवीण अहिरे व त्यांच्या पत्नीवर ही बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल असतानाही त्यांना नंदुरबार येथे शिक्षणाधिकारी म्हणून सेवेत का घेतले? असा प्रश्न आमदार दराडे यांनी सभागृहात उपस्थित केला. आमदार भाई जगताप म्हणाले, न्यायालयीन निर्णय येण्यापूर्वी शिक्षणमंत्र्यांना असलेल्या अधिकारांच्या आधारे त्यांना निलंबित केले पाहिजे. एका प्रकरणानंतर त्यांची सवय सुटलेली नाही. त्यामुळे तत्काळ
निलंबित करण्याचा आग्रह त्यांनी धरला. तसेच राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे, काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनीही अहिरे यांना निलंबित करण्याचा आग्रह लावून धरला. सभागृहाचा रोष बघता पुन्हा चौकशी करून महिन्याभरात कारवाई केली जाईल असे मंत्र्यांनी आश्वासित केले.

आमदार मागणीला अर्थ नाही का ?

■ आमदार सभागृहात मागणी मांडतात. पण त्यावर योग्य कारवाई होत नसेल तर त्यांच्या मागणीला काहीच अर्थ नाही का? असा प्रश्न करत आमदार दराडे यांनी आपला रोष विधान परिषदेत बोलताना व्यक्त केला. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांना साथ देत निलंबनाची कारवाई करायला भाग पाडले. प्रश्न उपस्थित करणारे आमदार दराडे आणि शिक्षण मंत्री दादा भुसे हे दोघेही शिवसेना या एकाच पक्षाचे आहेत हे विशेष.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *