थकीत देयके मंजूर केल्यामुळे ‘झेडपी’ अधिकाऱ्यांचा सत्कार

प्रतिनिधी | नगर
मार्चच्या शेवटी जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे तीन वर्षांपासूनची सर्व थकीत पुरवणी, वैद्यकीय, रजा रोखीकरण बिले व सातव्या वेतन आयोगाचे १ ते ४ पर्यंतचे थकीत हप्ते मिळण्याची कार्यवाही पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, संध्या भोर आदींचा जिल्हा परिषदेत सत्कार करण्यात आला.

शिक्षक परिषदेच्या वतीने मागील तीन वर्षांपासूनची सर्व प्रकारची थकीत देयके मिळण्याची सातत्याने मागणी सुरू होती. संघटनेच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत शिक्षणाधिकारी कडूस व वेतन पथक अधीक्षक म्हस्के यांनी मार्चच्या शेवटी सर्व बिले निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी दिलेला शब्द पाळून सर्व थकीत देयके शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवानिवृत्तांना मिळण्यासाठी सर्व देयके मंजूर करुन कोषागार कार्यालयात सादर केलेली आहेत. ही सर्व देयके सर्वांच्या खात्यावर वर्ग होण्याचे काम सुरू आहे. या सहकार्याबद्दल जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांच्या वतीने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *