टीईटीच्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचा आंदोलनात्मक पवित्रा
नाशिक रोड : विशेष प्रतिनिधी
टीईटी संदर्भातील सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये गोंधळ आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने राज्यभरात आंदोलनात्मक पवित्रा घेत निवेदन मोहीम राबवली. नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.
नाशिकमध्ये विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम,निवासी जिल्हाधिकारी राजपूत आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयातील दीपाली पाटील यांना निवेदन देण्यात आले.शिक्षक परिषदेच्या निवेदनात दि. १३ फेब्रुवारी २०१३ रोजी राज्य शासनाने निर्गमित केलेला शासन निर्णय अबाधित ठेवण्याची आणि टीईटी परीक्षेमुळे निर्माण झालेली नोकरीवरील साशंकता दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय बडे म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिक्षकांमध्ये भीती व निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने घटनात्मक व कायदेशीर भूमिका स्पष्ट करून शिक्षकांचा विश्वास जिंकावा आणि २०१३ चा शासन निर्णय कायम ठेवावा. या वेळी जिल्हाध्यक्ष दत्ता वाघे पाटील,शहराध्यक्ष संजय पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक विनोदी हिरे, शहर कार्यवाह विनीत पवार, युवराज दानी, प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष रमेश गोहिल आदी मान्यवर उपस्थित होते.
