उशीरा आलेली जाग : शिक्षक भरतीसाठी टीईटी लागू करा : नतंर टीईटी कशासाठी : शासनाच्या ढीगभर अपेक्षा त्यात ‘टीईटी’ ची भर
महादेव पाटील : कुरळप

एमपीएससीच्या स्तरावरती घेतली जाणारी टीईटी परीक्षा शिक्षकांनी दिली पाहिजे व ती उत्तीर्ण व्हायलाच पाहिजे, शिक्षक वयाच्या कोणत्याही टप्यावरती असो, तो उत्तीर्ण व्हायलाच पाहिजे. सोबत त्याने निवडणुकीचे काम करायला पाहिजे, सर्व्हेचे काम, पोषण आहाराचे काम ऑनलाइन माहितीसुद्धा वेळेत संकलित करून पाठवलीच पाहिजे आणि एवढे करून विद्यार्थी स्पर्धेत टिकून गुणात्मक प्रगती घडून आलीच पाहिजे…. अरेरे. बापरे काय या शासनाच्या शिक्षकांकडून अपेक्षा. आता काय तर टीईटी उत्तीर्ण व्हा आणि स्वतःची गुणवता सिद्ध करा. शासनाच्या शिक्षकांकडून या सगळ्या अपेक्षा म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असा प्रकार होवून बसला आहे. याबाबतीत दैनिक तरुण भारत संवादकडून घेण्यात आलेला कानोसा….

टीईटीची परीक्षा, शासन धोरण आणि कोर्टाचा निर्णय एकंदरीत हा तिहेरी बाद सध्या महाराष्ट्र राज्यात सुरू असल्याचे दिसून येत आहे. टीईटीच्या सक्तीमुळे अखंड राज्यातील शिक्षक समुदाय एका विशिष्ट दहशतीखाली आला असून त्याच्या शैक्षणिक कामकाजामधील अडचणी वाढू लागल्या आहेत. एकंदरीत या सर्व
गोष्टींचा मिलाप करून राज्यातील सर्व शिक्षक समुदायाकडून राज्य शासनाच्या विरोधात आंदोलनाचा पुकार देण्यात आला आहे. राज्य शासनाने केंद्राला टीईटीच्या संदर्भात पुनर्विचार करावा व त्यासाठी केंद्राकडे मध्यस्थीची भूमिका करावी, यासाठी शिक्षक समुदाय आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करतो आहे.

शिक्षक हा शिक्षण सेवेत येत असताना तो असाच आलेला नाही. तो शिक्षक शासनाने निर्धारित केलेल्या काही परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे. या परीक्षा शासनाकडे प्रमाणित आहेत. त्याच माध्यमातून तो शिक्षण सेवेत आलेला आहे. त्यातील काही शिक्षकांची सेवा दहा वर्षाची, पंधरा वर्षाची, वीस वर्षाची बावीस वर्षाची झालेली आहे. इतकी वर्ष त्यांनी गुणात्मक सेवा देऊन विद्यार्थी घडवलेलेच आहेत. त्यानंतरही त्याला टीईटीची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा आग्रह हा वराती मागून घोडे नाचविल्याचा प्रकार सरकारचा असल्याचा निदर्शनास येतो आहे. न्यायालयाच्या निकालाबाबत पुनर्विचार करून राज्य शासनाने सेवेत असलेल्या शिक्षकांची भूमिका केंद्र सरकारकडे मांडावी, अशी मागणी शिक्षण समुदायाकडून होत आहे.

टीईटी या परीक्षेची काठीण्य पातळी एमपीएससीच्या स्तरावरील आहे. या परीक्षेचा निकाल हा फारच बेताचा लागतो. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्यांच्या जवळ अभ्यास करण्यासाठी पुष्कळसा वेळ उपलब्ध पाहिजे.

वास्तविक शिक्षकांच्या एकूण वेळेचा विचार केला तर अध्यापन करणे याच्यासह इतर कामातून शिक्षकांना मिळणारा वेळ फारच कमी आहे. शाळाबाह्य कामात व्यस्त असलेला शिक्षक, अध्यापनाचे सुद्धा काम करतो आहे. याचा विचार कदाचित सरकारला आलेला नसावा.

शाळाबाह्य इतकी कामे करून सुद्धा परत त्याला गुणात्मक विद्यार्थी घडवण्यासाठी व स्पर्धेत विद्यार्थी टिकवण्यासाठी आग्रह धरला जातो आहे. शाळाबाह्य कामाला लावून पुन्हा त्याच्याकडून टीईटीसारख्या परीक्षेची सक्ती करून शासनाला यातून काय साध्य करायचे आहे. शासनाच्या या अपेक्षा पूर्ण करताना भविष्यातील विद्यार्थी घडतील का असा प्रश्न सरकारला का पडत नसावा, शिक्षकांच्या बाबतीत सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे की काय असा प्रश्न आता सर्व सामान्यांना पडू लागला आहे.

शिक्षकावरतीच संशय का….
भारतीय संस्कृती ज्यांनी जपली, संवर्धित केली, वाढवली त्याचा मूळ पाया हा शिक्षक आहे. शासनाच्या प्रामाणित परीक्षा उत्तीर्ण होऊनच शिक्षक शिक्षण सेवेत आलेला आहे. अनेक वर्षाची सेवा करून तो शिक्षक अनुभव सिद्ध झाला आहे, कौशल्याने परिपूर्ण झालेला आहे. शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक हा मार्गदर्शकाचे काम करतो. त्याच्या अनुभवाच्या कौशल्याच्या या सर्व गोष्टींच्या पुढे नवीन परीक्षा काय कामाच्या आहेत. एमपीएससी परीक्षा पास होऊन एकदा अधिकारी बनला तर नंतर त्यांच्या परीक्षा होत नाहीत. मग शिक्षकांच्या परिक्षा कशासाठी? ज्या शिक्षकाने अधिकारी घडवले, वकील घडवले, न्यायाधीश घडवले, यापुढेही जाऊन मंत्री सुद्धा बनवले अशा शिक्षकावरतीच टीईटी परीक्षेची सक्ती करुन संशय व्यक्त केल्याचा प्रकार आहे. विनाकारण टीईटी परीक्षा घेणे हे अयोग्य आहे.
डॉ. दत्तात्रय घुगरे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा
मुख्याध्यापक महामंडळ पुणे.

इतक्या वर्षांनी परीक्षा नको….
शिक्षकांकडून इतके वर्ष सेवा बजावली जात आहे आणि आता इतक्या वर्षानंतर परीक्षा घेणे योग्य नाही. अनेक शिक्षक सेवानिवृत्तीला आले आहेत. शिक्षकांना अशैक्षणिक कामांचा आधीच लोड आहे. अध्यापना व्यतिरिक्त निवडणूक, सर्व्हे, मध्यान्ह भोजन प्रक्रिया याशिवाय इतर अनेक कामे शिक्षकांना लावली जातात. त्यात पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यासाला वेळ कसा मिळणार. नोकरीच्या शेवटच्या टप्यात परीक्षा घेऊन त्याचा काय उपयोग होणार आहे. शासनानेच या निर्णयाला आव्हान देऊन शिक्षकांना न्याय द्यावा.
सौ. मनिषा जंगम, मुख्याध्यापिका करंजवडे हायस्कूल, करंजवडे

९० टक्के पेक्षा जास्त शिक्षक ताणावात…
शिक्षक अध्यापनाबरोबरच शालेय उपक्रम, स्कॉलरशिप परीक्षा नियोजन व आयोजनात असतात. सकाळी आठपासून सायंकाळी सहापर्यंत अध्यापनात व्यस्त असतात. यासह निवडणूक, बीएलओ, विविध प्रकारचे सर्वेक्षण, शालेय पोषण, आहार नियोजन, विविध सांख्यिकी माहिती, ऑनलाईन पाठवणे यासाठी विविध फोटो व्हिडिओ तयार करणे, ते दिलेल्या पोर्टलवर अपलोड करणे यासाठी जास्त वेळ लागतो. या सर्वामधून सद्यस्थितीत सुमारे ९० टक्के पेक्षा जास्त शिक्षक समुदाय मानसिक ताण तणावातून जात आहे. सरकारने या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन शिक्षकांना केवळ अध्यापनाचेच काम देणे गरजेचे आहे.
राजेंद्र सूर्यवंशी, राज्य कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *