जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी काळ्या फिती लावून काम करणारे शिक्षक
जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक परिषदेचे निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू व्हावी आणि म्हणून वित्त विभागाने काढलेला ३१ ऑक्टोबर २००५ चा शासन निर्णय रद्द करावा, याकरिता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यामार्फत मुख्यमंत्री शिक्षण मंत्री व सचिवांना निवेदन देण्यात आले. शासनाने हा निर्णय घेतला होता म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद भंडारा जिल्ह्याच्या वतीने हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन केले होते. राज्यातील मान्यता प्राप्त अनुदानित शाळांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांना सेवा शर्ती नियमावली १९८१ मधील नियम नियम क्रमांक १९ नुसार देय असलेली जुनी पेन्शन योजनेपासून शिक्षकांना वंचित केले. परिभाषित अंशदान पेन्शन योजना लागू करण्याचा शासन निर्णय ३१ ऑक्टोबर २००५ ला काढण्यात आला. या प्रकारामुळे संपूर्ण शिक्षक कर्मचारी यांचे भवितव्य अंधकारमय झाले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून यापूर्वी सुद्धा या निर्णयाला रद्द करण्यात यावे, म्हणून अनेक आंदोलने करण्यात आलेली आहेत परंतु शासन अद्यापही कोणताही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाही आणि म्हणून हा दिवस शिक्षक कर्मचाऱ्यांच्या जीवनातील काळा दिवस आहे. म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून हा दिवस काळा दिवस पाळण्याचे घोषित करण्यात आले शिक्षणाधिकारी माध्यमिक संजय डोरलीकर यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अंगेश बेहलपाडे, सुभाष गरपडे, श्रीकांत हरडे, सचिन तिरपुडे, मनीषा काशिवार पांडुरंग टेंभरे, राजेश निंबार्ते, पराग टेंभेकर, राधेश्याम धोटे, स्नेहल खानापूरकर, वंदना पोहाणे, सेवकराम
कुथे, पांडुरंग दराडे, पुरुषोत्तम डोंमळे अविनाश पाठक, प्रा. पितांबर उरकुडे आदी उपस्थित होते.
