चामोर्शीत महिला मेळावा व मतदार जनजागृती
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा उपक्रम

पुण्य नगरी / प्रतिनिधी
चामोर्शी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोलीतर्फे जागतिक महिलादिन व मतदार जनजागृती मेळावा ३० मार्च रोजी जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राधा शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोलीच्या महिला आघाडी प्रमुख मृणाल तुम्पल्लीवार तर महाराष्ट्र प्रमुख अतिथी म्हणून अॅड. प्रेमा आईंचवार, आरती भिमनवार, कोमल सेलूकर उपस्थित होत्या.

याप्रसंगी राधा शिंदे यांनी स्त्रियांवरील अत्याचार व त्याचे निर्मूलन यावर मार्गदर्शन केले. अँड. प्रेमा आईंचवार यांनी स्त्रियांवरील कायदे यावर प्रकाश टाकला. आरती भिमनवार यांनी महिला सक्षमीकरण यावर भाष्य केले. तर मृणाल तुम्पल्लीवार यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेत महिलांचे योगदान त्यात प्रामुख्याने परिषदेच्या पहिल्या महिला आमदार संजीवनी रायकर याने महिलांकरिता शासनाशी संघर्ष करून महिलांना मिळवून दिलेल्या हक्कांबद्दलची माहिती दिली आणि मतदार जनजागृतीबद्दल मार्गदर्शन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करीत असलेल्या शिंदे यांचा त्याचप्रमाणे कवयित्री भारती तितरे यांनी लिहिलेल्या ‘जीवन गाणी’ या पुस्तकाला अनेक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मतदार जनजागृती पत्रकाचे विमोचन करण्यात आले आणि उपस्थितांना वाटण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन नम्रता मार्तीवार तर आभार कुसुम सावसागडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार, जिल्हा गडचिरोलीचे अध्यक्ष नुतील कंठावार, जिल्हा कार्यवाह सागर आडे व समस्त जिल्हा पदाधिकारी व चामोर्शी तालुका पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *